मित्रांनो, कसे आहात?
आज माझ्या अकादमीचे ३ वर्ष पूर्ण होत आहेत. ह्या वेळी खूप काही लिहावेसे वाटते पण वेळ कुठे आहे? त्यामुळे थोडेसेच लिहेन…
जेव्हा मी ही अकादमी सुरु केली तेव्हा असे वाटत होते कि मी एकटाच आहे आणि पुढील प्रवास कसा होईल ह्या विचाराने पहिले पाउल पुढे केले. मनात एकच विचार होता कि जगात एकटाच आलो होतो आणि एकटेच पुढे जायचे आहे. कारण माझा अनुभव फारच वेगळा होता. जगात आपल्याला साथ देणारे खूप जण भेटतात पण मधेच सोडूनही देतात. हे समजण्यासाठी flashback मध्ये जाणे जरुरी आहे. भारतीय वायुसेना सोडल्यानंतर मिळालेली सर्व रक्कम टाकून स्वत:ची सोफ्टवेअर फर्म सुरु केली. त्यात मला कटू अनुभव आला. एम.सी.ए.साठी माझ्या फर्ममध्ये ६ महिन्यांचा प्रोजेक्ट करणाऱ्या काही मुलांनी माझे सोफ्टवेअर मधेच सोडून दिले. केव्हा? जेव्हा मी त्यांच्या प्रोजेक्ट रिपोर्टवर सही केली तेव्हा!!! त्याचं कर्तव्य होत कि माझे सोफ्टवेअर पूर्ण करावेत परंतु ह्या जगात मतलबी लोक असतात ह्याचा कटू अनुभव मला सुद्धा यावा? ते विसरून जाऊन मी परत एकदा आणखी एक पाउल टाकले आणि पुढील ५ वर्षात फार उंच भरारी मारली पण मग काही परदेशी क्लायंटनी लाखो रुपयाने बुडवले. त्यात भर ओतली ती जवळच्यांनी. जे जवळचे होते (ज्यांना मी तसे समजत होतो) अशांनी सुद्धा साथ सोडली. पुढील एक ते दीड वर्ष मी ती फर्म चालवली आणि मग बंद केली. मला त्यानंतर फार फार त्रास झाला. कुणाची मदत मिळेना. सर्व लोकांनी पाठ फिरवली. तेव्हा परत प्रत्यय आला कि ह्या जगात आपण एकटेच आलोत आणि एकटेच पुढे जायचे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचे शब्द आठवले – “एकला चलो रे !!!” आणि मग मागे न पाहता मी आणखी एक पाउल टाकले.
पुढील प्रवासही काहीसा सुखद होता पण खडतर सुद्धा होता.
आजरोजी भारताची एक नंबरची सोफ्टवेअर फर्म आहे तिला पहिला क्लायंट मिळायला ४ वर्षे लागले होते. हाच विचार मनात घेऊन पुढे निघालो.
मला जसे जमेल तशी मेहनत घेतली आणि ब्लोग व फोन मार्फत मी एमपीएससी व युपीएससीच्या उमेदवारांना हवे ते मार्गदर्शन करायला सुरुवात केली. दररोज १८ ते २२ तास ह्या कामासाठी दिलेत आणि ज्यांना ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी सर्वस्व पणाला लावले. मी दिवस बघितला नाही कि रात्र बघितली नाही. फक्त हाच विचार केला कि एमपीएससी व युपीएससीचे उमेदवार शहरातच काय खेडेगावात सुद्धा आहेत, त्यांच्यापर्यंत मदतीचा हात पोचावा आणि माझ्याकडून जसे जमेल तशी मदत केली आणि अजूनही करतोय.
अकादमीचे पहिले वर्ष फार अडचणीचे होते. मी विदर्भात स्वत: फिरलो, खेडोपाडी, लहान शहरात व मोठ्या शहरातील कॉलेजेस मध्ये जावून मार्गदर्शन केले, सेमिनार घेतले. त्यासाठी मी एक पैसाही घेतला नाही. मित्रांनो, एक गोष्ट सांगावीशी वाटते कि हे करत असताना मला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अडचणी आल्यात. दुसऱ्याचे भविष्य उजळून काढतांना माझ्या बीएचएमएस करणाऱ्या मुलीचे भविष्य अंधारात आहे असे वाटायची वेळ सुद्धा आली परंतु त्यावेळी मी माझे मन विचलित होवू न देता माझे कार्य करीत राहिलो. ह्याबद्दल मी नंतर कधी लिहेन.
माननीय शरद पवारांच्या बारामतीच्या व इंदापूर येथील इंजिनियरिंग कॉलेजमध्ये सेमिनार घेण्यासाठी आमंत्रण आले आणि मी तिथे जाऊन आलो. ह्यासाठी प्रोफेसर दिलीप पाटील सरांनी पुढाकार घेतला. इंदापूरच्या कॉलेजचे प्रिन्सिपल निर्मल सर व प्रोफेसर काळदाते सरांचे हार्दिक आभार. मला पहिल्यांदा दोन्ही ठिकाणी मानधन मिळाले.
अकादमीच्या दुसऱ्या वर्षात सफलता मिळाली “पीएसआय २०११”च्या परीक्षेत सफलता मिळवणाऱ्या विश्वास चव्हाणके यांच्या रुपात. त्यांचे ट्रेनिंग २६ ऑक्टोबर २०१३ला पूर्ण झाले आणि आता ते पुण्यात आहेत. त्यांच्याबद्दल वाचायचे असेल तर “फटा पोस्टर निकला हिरो” हे आर्टिकल वाचावे. कोल्हापूर (कबनूर) च्या रोहित ढवळे ने राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ मध्ये सफलता मिळवून त्याच्या व माझ्या कष्टाचे फळ केले. अनेक उमेदवार थोड्याशा गुणांनी मागे राहिले ह्याची खंत मला आहे. ते नक्कीच पुढील परीक्षेत सफलता मिळवतील हीच सदिच्छा.
ब्लोगवरील अनेक वाचक व OAP (टेस्ट सिरीज)चे काही उमेदवारसुद्धा राज्यसेवा, एस.टी.आय., पी.एस.आय. परीक्षेत सफल झालेत. कुणी तहसीलदार झालेत तर कुणी एसटीआय. त्यांचे मनोगत “About Us” मधील “Testimonials” ह्या पेजवर उपलब्ध आहेत.
मित्रांनो, जाता जाता असे सांगावेसे वाटते कि तुमच्यात जर अतूट विश्वास असेल तर तुम्ही कोणत्याही परीक्षेत सफलता मिळवू शकता. परंतु एक लक्षात ठेवा कि जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला द्या. कमीत कमी एक वर्षा-अगोदर अभ्यासाला लागा. जाहिरात येण्याची वाट बघू नका आणि आल्यावरच तयारीला लागू असा विचार करून ही घोडचूक करू नका. अकादमी सुरु करतानांची माझी दूरदृष्टी होती कि जास्तीत जास्त पुस्तकातूनच अभ्यास करायला हवा आणि आज रोजी एमपीएससीचा कोणताही पेपर बघा, त्यातील प्रश्नाचे स्वरूप बघा. असे दिसून येईल कि सखोल अभ्यास करणारच हा पेपर सोडवू शकेल. मित्रांनो, स्वत:चे नोट्स बनवा आणि तेही सखोल अभ्यास करूनच!!!
एमपीएससी किंवा यूपीएससीसाठी खूप काही मी लिहून ठेवल आहे ह्या ब्लोगवर. ते वाचूनही तुमच समाधान झाल नाही तर तुम्ही मला सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत केव्हाही फोन करू शकता. तुम्हाला मदत करून मला आनंदच होईल. मी जेव्हा तुमचा फोन घेतला नाही तर समजावे कि मी एकतर ड्राईव्ह करत असेल, मिटिंग मध्ये असेल नाहीतर झोपेत असेल.
तुमच्या अभ्यासासाठी शुभेच्छा!!!
तुमचा मित्र,
अनिल दाभाडे
20.093889
73.925613
Share this with your friends and relatives who can benefit from my blog: